Sunya Sunya Maifileet Majhya


उंबरठा सिनेमा मला वाटतं 1980 च्या आसपास रिलीज झाला होता. जब्बार पटेल दिग्दर्शित हा सिनेमा त्यावेळेस मला कंटाळवाना वाटला होता . अश्या कथेचा सिनेमा समजायचं ते वय ही नव्हतं . नंतर बराच काळ गेला आणि हा सिनेमा काय आहे ते समजलं आणि त्यामुळे तो सिनेमा परत परत बघितला गेला.
“सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या” हे गीत सुरेश भटांनी लिहिलं होतं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलं होतं.मुख्य व्यक्तिरेखा आहे सुलभा महाजन ची जी साकारली स्मिता पाटील ने. सामाजिक जाणिवा, नैतिक मूल्ये, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्यात होणारा राजकीय हस्तक्षेप यशा कात्रीत सापडलेल्या महिलेची ही कथा. 

                      
ती महिलांच्या तुरुंगाची वॉर्डन असते . आपले कर्तव्य पार पाडायचे म्हणून तिने जाणून बुजून हे क्षेत्र निवडलं असतं.
त्यासाठी तिला घर सोडावं लागतं.

ती कामाला वाहून घेते, मात्र हे करताना नेत्यांकडून, प्रतिष्ठितांकडून घेतला जाणारा गैरफायदा वगैरे पाहून सगळं काही सोडून संसारात परत यायचा निर्णय घेते. पण परत आल्यावर तिला समजतं की आपला नवरा आपला राहिला नाहीये आणि त्या मानसिक संघर्षात ती पुन्हा आपल्या सामाजिक आयुष्यातच परतायचा निर्णय घेते.

ओके आता या गाण्याबद्दल बोलूया

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की,
अजून ही चांद रात आहे
उगीच स्वप्नात सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे ?
कळे न तू पाहशी कुणाला ?
कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे !
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे !


गीत -: सुरेश भट..
स्वर -: लता मंगेशकर..
संगीत -: पं. हृदयनाथ मंगेशकर..

असं ही म्हणतात की ह्या गीताला चौथं कडवं पण आहे. ते असं

उगाच देऊ नकोस हाका,
कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी
कुठेतरी दूर जात आहे


मात्र हे सुरेश भटांचं लिहिलेलं आहे की अन्य कुणाचं या बाबत खात्री नाही. सुरेश भटांची official वेबसाईट वर हे कडवं नाहीये


                
 या गाण्याबद्दलचा एक किस्सा असा आहे की जयश्री गडकर एक चित्रपट तयार करत होत्या आणि त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांना संगीतकार म्हणून निवडलं होतं. जयश्रीबाईंनी त्यांना विचारलं की तुम्हाला गीत करायचे काम कोणाला द्यायचे? तर मंगेशकरांनी सांगितलं सुरेश भटांना द्यायचे. गडकरांनी ते मान्य केलं मग सुरेश भटांना मंगेशकरांनी कॉन्टॅक्ट केलं आणि भट मुंबईत आले. ते अमिगो हॉटेलमध्ये राहिले.
असं ठरलं की प्रत्येक गीताची रु. ५००० बिदागी त्यांना देण्यात येईल. मग झालं असं की दिवस उलटून गेले, एक आठवडा गेला, दोन आठवडे गेले पण भटांकडून गीतं काही आली नाहीत . मंगेशकरांनी विचारलं त्यांना की, "मी दुसऱ्या गीतकाराकडे जाऊ का?".  तर ते म्हणाले आपण प्रयत्न करूया. पण शेवटी ते नाही झालं.

आणि एक दिवस सुरेश भट नागपूरला जायला निघाले. जयश्रीबाईंना हे समजतं. त्या तडकाफडकी त्यांची भेट घ्यायला स्टेशनवर गेल्या. दोघे भेटले आणि भट म्हणाले की मी नाही लिहू शकलो. तरी पण तुम्ही एक कागद द्या. त्यांना कागद दिल्यावर त्यांनी भरभरा ज्या ओळी लिहून दिल्या याच गाण्याच्या - सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या - त्या ओळी वाचून बाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी भटांना त्यांच्याकडे होते ते पंधराशे रुपये त्यांना देऊ केले.
भट म्हणाले, “मला पैसे नको कारण मी तुमचं काम नाही केलं आणि हे देवाची देणगी आहे. मला काही नको तुमच्याकडून तुमचा पाहुणचार मी फुकट घेतला याची बोच मला राहील.” आणि ते पैसे न घेता निघून गेले.
पण नंतर काही कारणांनी तो चित्रपट बनला नाही आणि ते लिहिलेलं गीत हृदयनाथ मंगेशकरांकडे तसेच राहून गेलं.
काही वर्षांनी त्यांना जब्बार पटेल भेटले आणि “उंबरठा” बद्दल बोलणं झालं. तेव्हा हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना विचारलं की एक गीत आहे सुरेश भटांचं. तुम्हाला ऐकायला आवडेल का? जब्बार पटेलांनी ते ऐकलं , त्यांना आवडलं आणि ते गीत सिनेमामध्ये घेतलं गेलं.

Link 

https://www.youtube.com/watch?v=sIL8mx-GO4A


तर हे गाणं जेव्हा जब्बार पटेल यांनी पसंत केलं तर त्याच्या एका कडव्यामध्ये एक वाक्य आहे –
कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे कोणीतरी आरशात आहे !

तर यातलं “कोणीतरी” हा शब्द जब्बार पटेल यांना खटकला. ते म्हणले की “कोणीतरी” आहे, हे कोणाला उद्देशून आहे? म्हणजे ती नवऱ्यापासून दूर राहते मग तिचा कुणी प्रियकर आहे, असा त्याचा चुकीचा अर्थ येतो आणि मग तिथे त्याला इंग्रजीत स्टेलमेट म्हणतात अशी सिच्युएशन तयार झाली.  सुरेश भटांनाही ते समजलं की हा शब्द चित्रपटात ह्या प्रसंगात अप्रस्तुत आहे. पण मग त्यांना त्याच्यावर अल्टरनेट शब्द सुचेना.

सुदैवाने जवळपास दुसऱ्या एका चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं तिथे शांताबाई शेळके होत्या. त्यांच्याकडे जेव्हा हा डायलॉग घेऊन हे लोकं गेली तेव्हा, “कोणीतरी” ऐवजी “तुझे हसू” असं त्यांनी सुचवलं. मग ते कडवं झालं
कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !

             
 

अशा रीतीने त्या कडव्यातलं शब्द बदलले गेले. आता परत या गाण्याच्या सिनेमातील background कडे परतुया. हे गीत म्हणजे त्या protagonist चा तिच्याशीच असलेला संवाद आहे. म्हणजे तिच्या मनातील द्वंद्व नकळत तिच्या ओठावर आले असे या गाण्यात प्रतीत होतं. तर ती बऱ्याच दिवसांनी स्वतःला आरशात पाहताना ती संभ्रमित झाले की हे आरशातली ती नक्की कोण आहे? ही मीच आहे की अन्य कोणी? माझा आयुष्य जिथे सुरू झालं होतं तिथून ती बरंच पुढे आलेली आहे. आधीची हसरी , आयुष्यातली सुख उपभोगायला आसुसलेली, चैतन्याने पूर्ण भरलेली ती, पण आता वेगळीच आरशात दिसणारी. जाणीवा प्रगल्भ झालेल्या, प्रवाहाविरुद्ध जाण्याची ओढ असलेली आणि त्या बंडखोरपणामुळे एकटी पडलेली सुलभा, तिला आरशात दिसते.

तिच्या या मनोवस्थ्येचं वर्णन सुरेश भटांनी अचूक पकडलय. आज ती स्वतंत्र आहे, तिला अस्तित्वाची जाणीव आहे आणि तरी ही ती आजही स्वतःच्या शोधात आहे. आरशात पाहताना तिला थोडं हसूही येतं कारण तिला तिची मुलगी आठवते आणि तिला जाणवतं की तिच्यातली आई, तिच्यातली पत्नी अजूनही जागी आहे.  त्याच वेळेस आपण आयुष्यातील काही अतिशय गोड, सुखाच्या क्षणांना मुकलय, पारखं झालोय याची जाणीव ही तिला आहे.

Comments

Popular posts from this blog

Paradhin Aahe Jagati Putra Manavacha

संदीप खरेच्या कविता

One song inspires many more