Posts

Showing posts with the label मराठी कविता

सुरेश भट - आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ? माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले? ह्रदयात विझला चंद्रमा... नयनी न उरल्या तारका... नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा? अजुनी मला फसवायला हे कुठले निमंत्रण राहिले? ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ... मी मात्र थांबुन पाहतो मागे कितीजण राहिले? कवटाळुनी बसले मज दाही दिशांचे हुंदके माझे अता दु : खासवे काही न भांडण राहिले! होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले. अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले? ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे हे आसवांचे तेवढे अध्याप तोरण राहिले.

रोपटे - सुरेश भट

काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो, मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही, सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो? मी अता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे... जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो. का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो? मी तुम्हासाठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो आज कैशी आपुली ही भेट ताटातूट झाली? भेटतांना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो? मी चुका केल्या तरीही काय हे नाही पुरेसे? मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला- मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो

सूर मागू तुला मी कसा? - सुरेश भट

सूर मागू तुला मी कसा? जीवना तू तसा, मी असा. तू मला, मी तुला पाहिले एकमेकांस न्याहाळिले दुःख माझा तुझा आरसा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा खेळलो खेळ झाला जसा खूप झाले तुझे बोलणे खूप झाले तुझे कोपणे मी तरीही जसाच्या तसा रंग सारे तुझे झेलुनी शाप सारे तुझे घेउनी हिंडतो मीच वेडपिसा काय मागून काही मिळे ? का तुला गीत माझे कळे ? व्यर्थ हा अमृताचा वसा